भारतात ११ प्रकारचे पोपट आढळतात. दिसण्यात, रंग रूपात कमी-जास्त फरक असतात पण मराठीत आपण त्यांना पोपट म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का या ११ मधे एकमेव खरा पोपट आहे आणि तो म्हणजे “पिचू पोपट ज्याला भुंडा पोपट” असेही म्हणतात. याचे इंग्रजीत नाव “वर्नल हँगिंग पॅरेट – Vernal Hanging Parrot” असे आहे.
तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? पण थांबा … इंग्रजी नावांप्रमाणे बाकी पोपट हे parakeet आहेत ज्यांची लांब शेपटी असते.
तर चला प्रवासाची सुरुवात करूया, पुण्यातील स्वारगेट पासून साधारण ४० किमी अंतरावर पांगरे गावाजवळ आहे शेलार फार्म. आम्ही पुण्यातून पहाटे ५.३० ला निघालो (गूगल मॅप ची लिंक या लेखाच्या शेवटी तुम्हाला मिळेल).
जाताना ३-४ किमी अलीकडे सुंदर नागमोडी रास्ता, झाडी, डोंगर आणि सूर्योदय पाहायला मिळाला.
आम्ही बरोबर ७ वाजता तिथे पोहोचलो. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला होता, बाजरीच्या कणसांवर सूर्याची सोनेरी किरणे पडली होती.
बरेच पक्षी या बाजरीच्या कणसांवर मनसोक्त ताव मारत होते. आम्ही लगेच कॅमेरा तयार केला आणि एक एक पक्षी टिपायला सुरुवात केली.
मंगळवार असल्याने इतर छायाचित्रकार कोणी नव्हते, पण काही सोबती नक्कीच होते. शेताजवळ हे करडू बागडत होते आणि टेकडीवर या गायी चरत होत्या.
आम्ही पाहिलेल्या पक्ष्यांची ओळख करून घेऊयात:
हा सुंदर पिवळ्या आणि तपकिरी रंगाचा पक्षी आहे नर सुगरण (Baya Weaver – male ), मादी साधारणतः भुरकट रंगाची असते.
नदी किनारी झाडांवर अथवा शेतातील झाडांवर सुगरणीची सुंदर घरटी तुम्ही पहिली असतील.
सुगरण त्यांच्या अद्भुत विणकाम आणि सुंदर रंगांमुळे पक्षीप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत.
सुगरणाची मादी आणि हे काय तिचे पिल्लू पण आहे. कणसातून एक एक दाना काढायचा अवकाश आणि पिल्लू आ करुन बसलेलेच आहे 😄😄😄
लाल मुनिया (Red Avadvat )हा एक सुंदर पक्षी आहे, जो आपल्या आकर्षक रंगामुळे पक्षी निरीक्षण करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. या पक्ष्याच्या शरीरावर लाल रंग आणि छोटे छोटे ठिपकयांमुळे अधिक सुंदर दिसतो.
गौरव शेलार या तरुणाने या स्थलांतरी पोपटाचे महत्व जाणून इथे या पक्ष्यांच्या निरीक्षणाची आणि छायाचित्रकारांची सोय केली आहे. गौरव शेलार बरोबर आम्ही चर्चा करून या उपक्रमाबद्दल आणखी माहिती जाणून घेतली जी तुम्हाला आमच्या पिचू पोपटाच्या विडिओ मध्ये मिळेल.
हा आहे गोरली म्हणजे Common Rosefinch, याचे डोके, पाठ, छाती गुलाबी रंगाची असते. सुंदर पक्षी आहे नाही का?
हा आहे युवराज किंवा तुरेवाला भारीट किंवा शेंडीवाली रेडवा, किंवा बोचुरडी किनव्क डोंगरफेंसा बापरे एवढी नावे पण इंग्रजीत याल crested bunting म्हणतात.
युवराज नाव याला साजेस वाटत ते त्याच्या डोक्यावरील तुऱ्यामुळे.
हा आकाशात उडतोय सापमार गरुड म्हणजेच Short-toed Snake eagle.
मागे सारखा कटकट नाही पण वटवट केल्याचा आवाज येतोय अरे हा तर वटवट्या, राखी वटवट्या म्हणजे Ashy Prinia. एवढुसा पक्षी आहे पण आवाज मोठा असतो याचा.
तेवढ्यात तिथे केरळचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री जयराज सर त्यांच्या इतर मित्रांसोबत आले.
हि आहे ठिपकेदार मुनिया म्हणजेच Scally Breasted munia. केव्हातरी आकाशातून एक अति लांब शेपटीचा वाटणारा पक्षी उडत असतो, जर तो स्वर्गीय नर्तक नसेल तर तो शक्यतो ठिपकेदार मुनिया असते.
स्वर्गीय नर्तक चा विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा पक्षी आहे शुभ्रकंठी म्हणजे Indian silverbill.
बरेच पक्षी येत होते आणि जात होते पण ज्याच्यासाठी आम्ही येथे आलो तो बराच वेळ झाला तरी दिसेना मग तो एक झाडावर दिसला बघा तुम्हाला दिसतोय का:)
ओळखला का मला? मी आहे पिचू पोपट किंवा भुंडा पोपट म्हणजे वर्नल हँगिंग पॅरेट 🙂
हा असा झाडावरून उलट लटकत उतरतो आणि खातानाही उलट लटकुनच खातो म्हणूनच कदाचित या पोपटाला इंग्रजीमध्ये Vernal Hanging Parrot असे म्हणतात.
मराठीत आपल्यासाठी हा पोपटाच पण इंग्रजीमध्ये बाकीचे जे आहेत जसे की Rose Ringed parakeet, plum-headed parakeet, alexandrine parakeet हे parakeet आहेत पण भारतात parrot हा एकमेव vernal hanging parrot आहे.
हा साधारण पावसाळ्यात खाण्याच्या शोधात कोकणातून इथे येतो. यांचे मुख्य खाद्य हि छोटी फळे, बिया, धान्ये जसे कि बाजरीची कोवळी कणसे. हे आग्नेय आशिया च्या काही भागांत तसेच भारतीय उपखंडात आढळणारे पक्षी आहेत. चकचकीत हिरव्या रंगाचा, लाल चोच आणि गळयावर एक निळसर भाग म्हणजे नर-पक्षी. शेपटीच्या बाजूला गडद लाल पाठ नर-पक्ष्यांमध्ये आढळते . गळयावर निळसर भाग नसेल तर मादा किंवा पूर्ण वाढ न झालेलं तरुण पक्षी.
ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात इथे पीक म्हणून बाजरी लावली जाते. त्यांना कणसे आली हे पोपट येथे दिसू लागतात. कणसातील बाजरीची दाणे काढून त्यातील रसाळ भाग हे खातात आणि दाणे सोडून देतात.
पक्ष्यांना मोकळ्या वातावरणात स्वच्छंद उडताना, बागडताना आणि निर्भीड जगताना पाहायला किती छान वाटते हो ना?
कसे पोहोचाल?
स्वारगेट पुणे येथून दिवे घाटातून सासवडला जायचे. सासवड मधून बाहेर पडलात कि उजव्या बाजूला वीर धरणाकडे जायला एक रास्ता आहे. तिकडे वळून पुढे साधारण ८-९ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूलाच शेलार फार्म आहे. गूगल मॅप पाहत जाल तर सोपे जाईल अथवा शेलार फार्म लक्षात येत नाही.
- स्वारगेट (पुणे) ते शेलार फार्म अंतर : ४० किमी
- उत्तम वेळ / हंगाम : साधारण जुलै अखेर ते ऑक्टोबर सुरुवात पर्यंत