ताडोबाच्या आठवणी – ओळख ही पहिली पोस्ट खरं तर, ताडोबा सहलीतील दुसरी सफारी होती. आमच्या ताडोबाच्या सहलीचा श्रीगणेशा हा मदनापूर बफर झोनपासून झाला. ताडोबाला भेट देण्यापूर्वी आम्ही व्याघ्र प्रकल्पात ६ सफारी केल्या होत्या. थोडेसे फ्लॅशबॅक मध्ये जाऊन सांगायचे तर, जानेवारी २०१५ ची ही गोष्ट. जानेवारी २०१५ आयुष्यात एक वेगळाच अनुभव देऊन गेला ज्याने नविन आवड आणि छंद जोपासण्याची सुरुवात झाली. प्रवास आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. जानेवारी २०१५ मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानात जाण्याचा योग आला. जंगल सफारी वगैरे असला काही प्रकार असतो हे तेव्हा कळाले. जंगल म्हणजे मोठी घनदाट झाडे यापलीकडे काही माहित नव्हते. जिथे भरपुर झाडे दिसतील तेच आमच्यासाठी जंगल. पण तिथे झाडांशिवाय वन्य प्राणी, पक्षी मोकाट हिंडताना, उडताना दिसतात आणि आपण त्यांना एका उघड्या गाडीतून पहायला जातो हे कळाले तेव्हा मात्र मनात जे विचार आले ते शब्दात सांगणे कठीण आहे. तर २०१५ पासुन व्याघ्र प्रकल्पात ६ सफारी केल्या. ५ सफारी या कान्हामध्ये तर १ सफारी राजस्थान मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात. पण जंगलाच्या राजाचे म्हणजे वाघाचे दर्शन एकदाही झाले नव्हते. तरीही आम्हाला त्याच्या आजुबाजूला असण्याची जाणीव अलार्म कॉल मार्फत अनुभवता आली.
जेव्हा एखादा हिंस्त्र प्राणी आढळतो तेव्हा इतर प्राणी जसे की चितळ, सांबर, मोर आणि वानर विशिष्ट प्रकारे ओरडतात. हिंस्त्र प्राण्याच्या उपस्थितीबद्दल इतर प्राण्यांना जागरूक करण्यासाठी ते जो आवाज काढतात त्याला अलार्म कॉल म्हणतात.
आम्ही मागील सफारींमध्ये असे अलार्म कॉल ऐकले होते. पिंजऱ्यातला वाघ पहाण्यापेक्षा जंगलात स्वैर हिंडणारा वाघ पाहण्याची मजाच वेगळी अर्थात गाडीत बसुन. असो, वाघ जरी पाहता आला नाही तरी या नैसर्गिक संपत्तीचे सौंदर्य, तिथली मन प्रसन्न करणारी तर कधी गुढ वाटणारी शांतता अनुभवली. जो काही अनुभव आला त्याने जंगलाच्या अधिकच प्रेमात पडलो.
एवढ्या प्रतिक्षेनंतर जेव्हा ताडोबाला गेलो तेव्हा मात्र वाघाचे मनसोक्त दर्शन घडले.
बफर झोनमध्ये वाघ दिसेल याची अपेक्षा खरोखर नव्हती पण…हे ताडोबा आहे 🙂
ताडोबाचे क्षेत्रफळ तुलनात्मकदृष्ट्या लहान असले तरी वाघांची संख्या त्यामानाने जास्त आहे. ताडोबामध्ये सहसा कोणी निराश होत नाही (पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की वाघ हमखास दिसेलच). आमचे मित्र मंगेश देशपांडे यांनी मदनापूर बफरमध्ये एक आणि इतर सफारी कोअर झोनमध्ये करण्याचे सुचवले. मग सर्वांनी ठरवुन मदनापूर बफर झोनमध्ये पहिली सफारी नक्की केली. आम्हाला या बफर झोनमध्ये वाघ दिसण्याची खरोखरच अपेक्षा नव्हती. किंबहुना भूतकाळातील अनुभवांमुळे वाघाची आपल्या समोर येण्याची इच्छा नाही असे वाटायला लागले. शिवाय, आम्ही ऐकले होते की कोअर तुलनेत बफर झोनमध्ये वाघ दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. कोअर झोन, पर्यटकांची वाहने आणि वनरक्षक सोडल्यास मानवी हस्तक्षेपाशिवाय असतात म्हणून वाघ तेथेच राहणे पसंत करतात.
आणि आमची पहिली ताडोबा सफारी सुरू झाली
आमची दुपारची सफारी होती जी २.३० वाजता सुरू होते आणि साधारण ६:०० वाजता संपते. मदनापूर झोन हा नव्याने घोषित केलेला झोन होता म्हणून उद्यानात प्रवेश करण्यासाठी वाहने कमी होती. आमच्या कागदपत्रांची तपासणी झाली आणि आत प्रवेश केला. आत पोहोचल्यावर एकेक पाणवठा शोधत होतो पण कुठेही वाघाची चाहूल नव्हती. अधेमधे नीलगाय(Neelgai or Bluebulls) गवत चरताना दिसली. नीलगाय ही आशिया खंडातील सर्वात मोठी हरीण प्रकारातील स्थानिक प्रजाती आहेत. त्यांच्यामध्ये नर आणि मादी ओळखणे खूप सोपे आहे. मादी ही तपकिरी रंगाची आणि बहुतेक शिंग नसलेली असते. तर नर नीलगायच्या डोक्यावर शिंग असुन नर निळ्या-राखाडी रंगाचा असतो. निलगाय हे सहसा दिवसा वावरणारे प्राणी असतात.
मधेच एक घोरपड(Monitor Lizard) जमिनीवर पडलेल्या पानांमधून सरपटत होती. त्याच वेळी एक सशासारखा प्राणी(Indian Hare) देखील बांबूच्या झाडाच्या दिशेने निघाला होता. ससा आणि हा प्राणी एकाच कुटुंबातील आहे. पण याचे मागचे पाय मजबूत आणि लांब असतात. हे बहुधा झिगझॅग पॅटर्नमध्ये उडी मारत पुढे जातात. उद्यानाच्या या क्षेत्रामध्ये मुख्यतः सर्वत्र पसरलेल्या बांबूच्या झाडाचा समावेश आहे.
झुनाबाईचे वास्तव्य हे त्याच भागात होते आणि तिची दोन पिल्लेही तिच्या बरोबर असल्याने कदाचित आज वाघ नक्की दिसेल असेही वाटायला लागले. झुनाबाई ही एक वाघीण हे एव्हाना तुम्हाला समजले असेलच. नेहमीच्या पाणवठ्यावर ती दिसली नाही मग काही किलोमीटर अंतरावर दुसर्या पाणवठ्यावर पाहिले, तिथेही नाही. आता काय करावे कारण मार्गदर्शक(Guide) म्हणाला ती सहसा तिथे नाहीतर इथे असते. मग ठरवले परत पहिल्या पाणवठ्यावर बघु कदाचित तिथे गेली असेल. इतर पाणवठे पाहून संध्याकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास आम्ही परत चेकपोस्टच्या बाजूच्या मुख्य पाणवठ्यावर आलो. तिथे जाऊन बघतो तर नाहीच. लवकरच, जवळपास सगळ्या गाड्या तिथे जमल्या. आमच्यापासून सुमारे ४० मीटर अंतरावर पाणवठा होता ज्यामध्ये वाघाला पिण्यासाठी आणि भिजण्यासाठी पुरेसे पाणी होते. पाणवठ्याच्या दोन्ही बाजूंना आणि आजुबाजुला घनदाट झाडी होती पण आम्ही जिथे उभारलो तिथे वरती आकाश आणि तळपता सुर्य. जवळपास ४८-५० अंश तापमानात उघड्या जागेत आम्ही वाघ दिसण्याची वाट पहात होतो. डोळे सोडता शरीराचा संपुर्ण भाग कपड्याने झाकलेला, बरोबर असलेल्या पाण्याच्या बाटल्या एक एक करत पटापट संपत होत्या. उन्हाचा त्रास भयंकर होता पण डोक्यावरचे, अंगावरचे कापड काढणे म्हणजे आजाराला आमंत्रण. जवळपास ७-८ जिप्सी तिथे येऊन थांबल्या आणि उन्हामुळे माणसांचा चिवचिवाट सुरू झाला…हाश्श… हुश्श. अर्धा तास झाला तरी ना कॉलींग ऐकु आले ना वाघ दिसला. जंगलात जे दिसेल ते अनुभवावे याचा प्रत्यय इथे आला.
आजूबाजूला वाघाचे कोणतेही चिन्ह नसल्याने एक वानरीण आपल्या मुलासह तहान शमवण्यासाठी पाणवठ्यावर खाली उतरली होती. पाणवठ्याजवळ एक जांभळा सूर्यपक्षी(Purple Sunbird) पाइपमधून गळणारे पाणी हवेतच उडत पीत होता.
बरीच वाट पाहिल्यानंतर सुखाचा धक्का 🙂
आम्ही वानरांना आणि पिलांना पहाण्यात व्यस्त होतो इतक्यात दुसर्या गाडीचा चालक ओरडला “आली, आली” तेवढ्यात वानरे पिलांना घेऊन पसार झाली आणि सगळे वातावरण शांत झाले. सगळे फोटोग्राफर बंदूक घेतल्यासारखे कॅमेरा घेऊन तयार झाले तर कंटाळलेले आणि कॅमेरा नसलेले आनंदाने बघु लागले. सगळ्यांची नजर झाडांमधुन होणार्या हालचालींवर होती.
सोनेरी, काळ्या पट्ट्या असलेली एक आकृती झाडांमधुन येताना दिसु लागली आणि “आज आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा जंगलात मनसोक्त हिंडणारा वाघ दिसणार” याची खात्री झाली. ती आकृती संपूर्ण दिसायला लागली, एक वेगळाच अनुभव होता ज्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. अद्भुत क्षण होता तो ज्याची वाट आम्ही मागच्या काही वर्षांपासून पहात होतो. तेवढ्यात खटाखट आवाज सुरू झाले. मंगेशने आणि इतरांनी त्यांचे हत्यार काढुन करुन गोळ्या घालायला म्हणजे फोटो काढायला सुरुवात केली होती. मी मात्र व्हिडिओ घेण्यास उत्सुक होतो. पाणवठ्याजवळ दोन मोठी झाडं होती आणि डाव्या झाडाच्या बाजुने ती आकृती हळूहळू जवळ येत होती. पुढच्या क्षणाला ती एकदम समोर आली आणि पाणी प्यायला लागली. पाणी पिताना तिचे डोळे आम्हालाच पहात होते. बापरे काय क्षण होता तो… अक्षरशः अंगावर शहारे आले. आम्ही गाईडला विचारले हिची मुले कुठे आहेत? तर मार्गदर्शक(Guide) म्हणाला
“हा झुनाबाईचा बछडा आहे”…काय…बछडा?… एवढा मोठा.
पाणी पिऊन तो खाली पाण्यात येऊन बसला पण त्याचे डोळे अजुनही आम्हालाच पहात होते. तरी हे सर्व आम्ही साधारण ३०-४० मीटर अंतरावरून पहात होतो.
इतक्यात डाव्या बाजुने त्याची बहिण, झुनाबाईची मुलगी आली. पुढे येऊन ती त्या झाडाच्या मागे थांबुन, डोकं बाहेर काढून आम्हाला पहायला लागली. वाघाबरोबर लपंडाव खेळत असल्यासारखे वाटत होते मग ती पाण्यात उतरली आणि पाणी पिऊन भावाबरोबर जाऊन बसली. थोड्या वेळाने वाघ उठला आणि झाडाजवळ जाऊन अंग वाकडे तिकडे करत झाडाचा आधार घेत अंग ताणुन आळस झटकला. शरीर ताणताना त्याचा पंजा आणि ती तीक्ष्ण नखे पाहताना अंगावर काटा उभा राहिला. आळस झटकून तो झाडांमध्ये गेला आणि त्याच्यामागे त्याची बहीण गेली.
आता मात्र वाघाला पुढे थांबून पहाण्यासाठी धडपडणार्या गाड्या पटकन मागे वळुन वाघ कुठे निघेल तिकडे जाण्यासाठी धडपडत होत्या.तिथल्या गाईड आणि ड्रायवर यांना अंदाज असतो की वाघ साधारण कुठे जाईल, त्याप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन वाघांची वाट पहात थांबलो. काही मिनिटांत दोघे आले. दोघे परत झाडांमध्ये जाऊन बसले. त्यांची नजर मध्ये मध्ये आमच्या वर असायची. इतर भागात तपासणी करुन परत आलो आणि आम्ही पाहिले की हे संपूर्ण कुटुंब झुडुपात बसलेले आहे. झुनाबाई पुढे बसली होती आणि तिच्या मागे पिल्ले पक्ष्यांकडे बघत होती.
राजेशाही चाल अगदी बिनधास्त
सर्व गाड्या रस्त्यावर रांगेत उभ्या होत्या. थोड्या वेळात परत बछडा उठला आणि रस्त्याच्या मधोमध येऊन थांबला. थोड्या वेळापूर्वी त्यांना ३०-४० मीटर वरुन पाहिले पण आता तो दोन गाड्यांच्या मधोमध साधारण ३०-४० फुटांवर होता. झाडांमधून जात नंतर रस्त्यावर चालु लागला. सगळ्या गाड्या त्याच्यामागे गेल्या. रस्त्यावरुन चालणारा वाघ ही फोटोग्राफर साठी पर्वणीच असते. रस्त्यावरुन चालतानाचा हा क्षण आम्ही त्याच्या मागोमाग जात अनुभवत होतो. थोडी इकडची तिकडची पहाणी करुन तो बहिण बहीण आणि त्याची आई बसली तिकडे जायला लागला. लगेच गाड्या पुढची जागा मिळविण्यासाठी परत त्याजागी निघाल्या. जे समोर दिसत होते त्यावर विश्वास बसत नव्हता. कारण ३ मोठे वाघ काही अंतरावरुन आम्ही पहात होतो आणि ते आमच्याकडे पहात होते.
जंगल सफारीची वेळ संपत आलेली. संध्याकाळचे ५:४० झाले होते आणि आम्हाला बाहेर जावे लागणार होते. आम्ही तिथून निघालो. संध्याकाळी ६:०० नंतर कोणत्याही जिप्सीला पार्कमध्ये राहण्याची परवानगी नाही. सफारीची सुरूवात थोड्याशा निराशेने, रणरणत्या ऊन्हाने झाली तरी पुढचा वेळ कसा गेला समजले नाही. पहिल्या १.३० तासात एकापाठोपाठ एक रिकाम्या केलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि नंतर पाणी पिण्याची आठवणही येऊ नये यातच सर्व आले 🙂
गेटवर येऊन जिथे रहायची सोय होती तिकडे निघालो. साधारण ३० किलोमीटर वर खडसांगी गावात “ताडोबा टायगर व्हिला” येथे जायचे होते. अंधार पडला होता, रस्त्यात उजेड फक्त गाडीच्या दिव्यांचा होता आणि आजुबाजुला जंगलाचा परिसर. ताडोबाची पहिली सफारी ही अनपेक्षित आणि अविस्मरणीय झाली होती. ही तर सुरुवात होती कारण अजुन ६ सफारी त्याही कोअर झोनमधील शिल्लक होत्या :).