भारतामध्ये पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गावोगावी विहीरी खोदलेल्या आढळतात. काही आकाराने लहान तर काही अवाढव्य आकाराच्या. पण सर्वसाधारणपणे राजाश्रयातुन निर्माण केलेल्या विहीरी या पाण्याच्या स्त्रोत एवढ्याच हेतूने न बांधता धार्मिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचा स्त्रोत म्हणुन बांधण्यात आल्या. जिथे पाण्याबरोबर ज्ञानार्जनाचे कार्य आपसूकच घडत होते. अशीच एक विहीर रानी की वाव जी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे.
राणी की वाव ही
भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.
नविन १०० रु च्या नोटेवर तिचा फोटो गौरवार्थ छापलेला आहे.
गुजरातमधील अहमदाबाद शहरापासून जवळपास १२५ किमी अंतरावर असलेलं पाटण हे जिल्ह्याचे शहर. पाटण ही पुरातन काळातील राजधानी होती जी लोप पावलेल्या पवित्र सरस्वती नदीकाठी वसलेली. हेच पाटण शहर “रानी की वाव” किंवा “रानी नी वाव” या अभुतपुर्व स्थापत्यशास्त्राच्या कलाविष्काराचे स्थान आहे. गुजरातमध्ये विहिरीला बावडी किंवा वाव म्हणुन संबोधले जाते. सर्व विहिरींची राणी असा काहिसा अर्थ लावता आला तरी तिला राणी की वाव म्हणण्यामागे एक ऐतिहासिक तथ्य आहे. अकराव्या शतकात, तत्कालीन सोळंकी (चालुक्य) राणी उदयमती यांनी ही विहीर बांधली म्हणुन तिचे हे नाव. त्यांचे पती सोळंकी वंशीय राजा भिमदेव (प्रथम) यांच्या स्मरणार्थ राणीने ही विहीर बांधली.
रानी की वावच्या छायाचित्ररुपी प्रवासाची सुरुवात करुया
राणी की वाव जागतिक वारसा स्थळ असल्याने भारतीय पुरातत्त्व विभागाने ही जागा खुप छान पद्धतीने सुशोभित आणि स्वच्छ ठेवलेली आहे. वर्षभरात लाखो पर्यटक देशविदेशातुन येथे भेट देतात. तिथे जाताच सुरुवातीला छान बागबगीचा शिवाय काही दिसत नाही. थोडे पुढे जाता विहिरीच्या कठड्यावर लावलेले लाकडी कुंपण दिसायला लागते. जेव्हा तुम्ही विहीरीच्या प्रवेशद्वारावर जाता तेव्हा जमिनीखाली जे दिसते ते तुम्हाला अचंबित केल्याशिवाय रहात नाही. विहिरीपेक्षा जमिनीखाली बांधलेली काही मजली वास्तु म्हणा ना. हो सात मजली जमिनीखाली उलटे बांधलेल्या मंदिरासारखा आकार. प्रत्येक भिंत, खांब आणि कोपरा वेगवेगळ्या नक्षीकामांनी तसेच विविध देवीदेवतांच्या मुर्तींनी सुशोभित. खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने रचलेल्या. बराचसा भाग नष्ट होऊनही सद्यस्थितीत जे आहे त्यावरुन त्या काळातील या रचनेची कल्पना करता येईल.
रानी की वाव चे आकारमान
रानी की वाव हे उपयुक्त पाणीसाठ्याबरोबर धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थान म्हणुन बांधण्यात आली. ढोबळमानाने तिचा आकार १६१० स्क्वेअर मीटर आहे. तिची लांबी प्रवेशद्वाराजवळच्या तोरणापासुन पलीकडे विहिरीच्या आतल्या बाजुपर्यंत ७० मीटर, रूंदी २३ मीटर आणि खोली २८ मीटर आहे. विहिरीचा आकार पाण्याची गरज आणि संवर्धन ओळखुन तसेच मांगल्याचा प्रतिकासारखा म्हणजे एका मंदिरासारखा (उलटे बांधलेल्या) आहे. विहिर मंदिराप्रमाणे पुर्व-पश्चिम अशी बांधली आहे.
राणी की वाव चे तोरणद्वार
वावजवळ जाताच प्रथम दिसतात ते म्हणजे दगडी खांबाचे अवशेष जे तोरणद्वार असल्याची खात्री पटते. १९ व्या शतकात या विहिरीचे सर्वेक्षण केले गेले ज्यामध्ये “जेम्स बर्गेस आणि हेन्री काऊजेन्स” या इंग्रज पुरातत्व तज्ञांनी तोरणद्वाराबद्दल नोंद केली होती. दोन दगडी खांब असलेले हे तोरण एका नक्षीदार कमानीने जोडलेले होते. इथुनच खाली उतरायला विशिष्ट पद्धतीने रचलेल्या पायऱ्यांची सुरुवात होते.
राणी की वाव: स्थापत्य आणि नक्षीकलेचा आविष्कार
आधी सांगितल्याप्रमाणे ही वाव सात मजली आणि एका मंदिरासारखी आहे. ही वाव मरु-गुर्जर स्थापत्यशैलीची आहे. मरु-गुर्जर ही मंदिर स्थापत्य शैली असुन तिचा उगम पुरातन गुजरात आणि राजस्थानात झाला. आपण जसजसे खाली जातो तसतसे विहिरीचे ४ उंच भाग दिसतात मग त्यानंतर मुख्य विहिर. खाली घेतलेला फोटो पहिल्या भागावरुन घेतला आहे ज्यात आपण इतर ३ भाग पाहू शकता. पुर्वी विहिरीच्या तळापर्यंत (पाणी असेल तिथपर्यंत) म्हणजे खाली ७ मजल्यापर्यंत जाता येत असे. पण २००१ मध्ये भुज येथे झालेल्या भयंकर भुकंपाचे काही परिणाम आणि नुकसान इथेही झाले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पहिले ४ मजलेच पर्यटकांसाठी खुले आहेत.खाली उतरताना दोन्ही बाजुंना भिंतींवर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मुर्ती कोरलेल्या दिसतात. पुराणातील काही घटनाही मुर्ती रुपात पहायला मिळतात.
प्रामुख्याने दिसणाऱ्या मुर्तीं मधील विविधता:
- दैवी मुर्ती: जसे की देवी, ब्रम्ह, विष्णू, शिव, गणेश
- इतर देवता आणि पुराणातील घटना: दिग्पाल, पवित्र प्राणी आणि पक्षी संपदा, अप्सरा, नागकन्या, वसु आणि धार्मिक ग्रंथात उल्लेख केलेल्या घटना
- तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब
भिंतींवर कोरलेल्या शिल्पांना एका विशिष्ट पद्धतीने दर्शविले आहे. ज्यामध्ये मुख्य देवी देवतांना प्रामुख्याने दाखवले असुन बाजुला इतर अप्सरा, नागकन्या, दिग्पाल किंवा योगिनींची शिल्पे कोरलेली आढळतात. प्रत्येक मुर्तीवर केलेले सुक्ष्म कोरीवकाम पाहता आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. मुर्तींना पाहताना त्या अगदी जिवंत असल्याचा भास होते आणि घटना जणु समोरच घडत असल्यासारखे वाटते.
खाली छायाचित्रात दिसते ते शिल्प आहे महिषासुरमर्दिनीचे. महिषासुराचा वध करणारी देवी दुर्गा म्हणजेच महिषासुरमर्दिनी. शिल्पस्वरुपात ही घटना आम्ही पहिल्यांदा पाहिली आणि तीही इतकी अप्रतिम की बघतच राहिलो. तसेच बाजुला असलेल्या अप्सरांच्या शिल्पातील कोरलेले बारकावे पहा. अंगावरील आभुषणे, मोती तसेच कपड्यांवरील बारीक नक्षीकाम थक्क करणारे आहे.
शेषशायी विष्णू आणि २४ रुपांपैकी काही तसेच दशावतार शिल्पे
येथील शिल्पांमध्ये प्रामुख्याने नारायण अर्थात विष्णुंची आणि त्यांच्या वेगवेगळ्या रुपांची आणि अवतारांची शिल्पे जास्त प्रमाणात दिसतात. विष्णुंची आयुधे, शंख आणि कमळ धारण केलेल्या अनुक्रमानुसार 24 मुर्ती प्रकार किंवा रुपे आहेत त्यापैकी रानी की वावमध्ये खालील प्रकार आहेत: केशव, नारायण, गोविंदा, विष्णु, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, नरसिंह, हरी. याशिवाय 10 प्रसिद्ध अवतार देखील दर्शविले आहेत. परंतु त्या 10 अवतारांपैकी: वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बलराम, बुद्ध आणि कल्की (कलियुगच्या शेवटी येणारा भावी अवतार) हे स्पष्टपणे ओळखता येतात. बुद्धांना येथे भगवान विष्णूचा अवतार म्हणून दर्शविले गेले आहे.
याशिवाय सहज लक्षात न येणारे पण अप्रतिम असे अजुन एक महत्वाचे शिल्प पहायला मिळते ते म्हणजे “शेषशायी विष्णू“. मध्ययुगीन भारतात विहिर तसेच पाण्याच्या कुंडाजवळ ‘शेषशायी विष्णू’ मुर्ती स्थापन करण्याची परंपरा होती. मोढेरा येथील सुर्यमंदिरासमोरच्या कुंडात शेषशायी विष्णू मुर्ती पहायला मिळते. त्याच परंपरेला अनुसरून इथेही अशा ३ मुर्ती स्थापित केल्या आहेत. त्यांना तुम्ही खाली उतरताना बरोबर समोर मुख्य विहिरीच्या भिंतींवर पाहू शकता. सहसा लक्षात येणे तसे अवघड आणि अंतरावर असल्यानेही स्पष्ट दिसणे अवघड.
पण तुम्ही आमच्या राणी की वावच्या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे पाहू शकता.
खाली स्पष्ट असे छायाचित्र देत आहोत ज्यामध्ये शेषशायी विष्णू बरोबर वरती नवग्रहांची कोरलेली शिल्पे पाहु शकता.
राणी की वाव: भैरव
महादेवाच्या रुद्र अवताराचे एक स्वरुप म्हणजे भैरव. खाली छायाचित्रात असेच भैरव रुप अत्यंत प्रभावी स्वरुपात दर्शविले आहे. भैरव इथे नृत्य करताना (तांडव?) दर्शविले आहे. उजव्या बाजूला खाली एक कुत्रा, भैरवाच्या हातात धरलेल्या दैत्याच्या शिरातुन ओघळणारे रक्त चाटताना दर्शवले आहे.
ब्रम्हा, महेश आणि विष्णू त्यांच्या पत्नीसह असलेला शिल्पपट
खाली जिथेपर्यंत उतरण्याची परवानगी आहे तिथे पोहोचताच या वावच्या भव्यतेचा आणि येथील शिल्पकलेच्या समृद्धतेचा अंदाज येतो. तिन्ही बाजुंना विविध शिल्पपट कोरलेली आहेत. समोर काही मजल्यांवर मध्यभागी दालने आहेत. डाव्या बाजूला वरती, त्रिदेवांचा त्यांच्या पत्नींसोबत असलेला छानसा शिल्पपट आहे. नीट निरिक्षण केल्यास डावीकडून अनुक्रमे ब्रम्हा-सरस्वती, महेश-पार्वती आणि विष्णू-लक्ष्मी असे ओळखता येईल. या त्रिदेवांच्या जवळ त्यांचे वाहन अनुक्रमे हंस, नंदी आणि गरुड कोरलेले दिसतात.
उजव्या बाजूला वरती, पत्नीसोबत गणेश, महालक्ष्मी आणि कुबेर यांचा शिल्पपट पहायला मिळतो. या तिन्ही देवता समृद्धतेच्या प्रतिक असल्यामुळे एकाच शिल्पपटाच दाखविल्या असाव्यात.
रानी की वाव मधील इतर शिल्पे
- दिग्पाल: दहा दिशांचे रक्षण करणारे दिग्पाल
- ८ वसु: गायीचे शीर आणि मनुष्य शरीर स्वरुपात नमस्कार करणाऱ्या मुद्रेत दाखविले आहेत.
- नवग्रह: सूर्य, चंद्र, मंगळ, बुध (गृहपती), गुरु किंवा बृहस्पति, शुक्र, शनि, राहु ,केतु या नवग्रहांना शेषशायी विष्णू मुर्तीवर पहायला मिळते.
१९८७-८८ मध्ये उत्खननात गाळ काढताना ४८ सेंटीमीटर उंचीचे संगमरवराचे एक शिल्प सापडले. त्यावरती देवनागरी लिपीत ‘महारजनी श्री उदयमती’ असे कोरलेले आहे. वेळेअभावी आम्हाला ते पाहता आले नाही पण कदाचित ते शिल्प संग्रहालयात असावे.
बांधकामाची माहिती
रानी की वाव ही विटा, चुना आणि मुख्यतः ध्रंगधर दगडापासून बांधली आहे. पायऱ्या तसेच छतासाठी मोठमोठाले दगड एकमेकांमध्ये विशिष्ट आकाराच्या शिसम सदृश लाकडाच्या खुंटीने जोडलेले पहायला मिळतात.
काही ठिकाणी दगडांवर काचेच्या पट्ट्या लावलेल्या दिसल्या. गाईडला विचारल्यावर समजले, ज्या दगडांना भुज भुकंपानंतर भेगा पडल्या अशा भेगांवर या काचेच्या पट्ट्या लावल्या गेल्या. भेगांमुळे किंवा भविष्यात जर कधी त्या दगडांच्या रचनेत बदल झाला तर काच तुटुन त्याची पुर्वकल्पना मिळेल. जेणे करून पुढे होणारा अनर्थ टाळता येऊ शकेल.
आमचा रानी की वावचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
तुम्हाला शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे पण फारच खोलात जाऊन रानी की वाव बद्दल लिहायचे झाल्यास कितीतरी लेख लिहावे लागतील. एवढे पाहुनदेखील वेळेअभावी जास्त काही पाहता आले नाही असेच आम्हाला वाटते. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पुरेपुर वेळ देऊन जा तरच व्यवस्थित पाहता, अनुभवता येईल. तुम्ही जर पाहिली असेल तर तुमचे अनुभव किंवा अजुन काही नविन माहिती असल्यास आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.
राणी कि वाव येथे जाण्याची काही मार्गदर्शक तत्वे:
सर्वानी पाहावे असे उत्कृष्ठ स्थान (लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची खाली जाताना काळजी घ्यावी).
कसे पोहोचावे
विमान, रेल्वे आणि बसेस ने जाण्यासाठी, जवळचे शहर अहमदाबाद (१२५ किमी). अहमदाबादपासून रेल्वेने मेहसाणा पर्यंत आणि मग थेथून पुढे बसने ५८ किमी वर पाटण.
तिथे जाण्याची योग्य वेळ
तुम्ही वर्षभरात केव्हाही जाऊ शकता पण आमच्या मते हिवाळा उत्तम.
वेळेसंबंधी माहिती
सकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत
प्रवेश फी
- भारतीय नागरिकांसाठी ४०रुपये
- विदेशी पर्यटकांसाठी ६०० रुपये
- १५ वर्षाखालील मुलांना फुकट
टीप: आम्ही इथे दिलेली वेळेची, प्रवेश फी ची आणि इतर माहिती हि त्या वेळी आलेल्या आमच्या अनुभवाप्रमाणे/माहितीप्रमाणे दिलेली आहे. तरी आपण जाण्यापूर्वी तेथील पर्यटन विभागाशी संपर्क करून परत माहिती घ्यावी.
अन्य माहिती
- कॅमेरा बरोबर नेऊ शकता
जवळची ठिकाणे
- मोढेरा सूर्यमंदिर , अंतर जवळपास ३६ किमी.
इतिहास रानी की वाव, पाटण, गुजरात
अकराव्या शतकात, तत्कालीन सोळंकी (चालुक्य) राणी उदयमती यांनी ही विहीर बांधली म्हणुन तिचे नाव हे राणी की वाव. त्यांचे पती सोळंकी वंशीय राजा भिमदेव (प्रथम) यांच्या स्मरणार्थ राणीने ही विहीर बांधली..
६०० वर्षांहून जास्त काळ ही विहिर अज्ञात होती. सरस्वती नदीच्या पुराने वाहुन आलेल्या गाळामुळे ती जमिनीखाली बऱ्यापैकी गाडली गेली. १९ व्या शतकात इंग्रज पुरातत्व तज्ञांनी (जेम्स बर्गेस आणि हेन्री काऊजेन्स) केलेल्या सर्वेक्षणातुन तसेच त्या वेळी प्रवाशांनी (आर्थर मॅलेट आणि कर्नल जेम्स कोड) केलेल्या नोंदीतुन या विहिरीचे अस्तित्व सिद्ध होते. नोंदीत फक्त मुख्य विहिरीचा वरचा भाग आणि तोरणद्वाराबद्दल माहिती मिळते. कर्नल जेम्स टोड यांच्यानुसार तिथले दगड/अवशेष पाटण मधील दुसरी विहिर ‘बरोत नी वाव’ बांधण्यासाठी वापरले गेले. इंग्रज अधिकारी एस. के. फोर्ब्स यांनी सुद्धा रानी की वावच्या अवशेषांबद्दल नोंदी केलेल्या होत्या. जवळील सरस्वती नदीच्या पुराने आणि जमिनीखाली गाडले गेल्याने ही विहिर मधल्या काळात मुस्लिम आक्रमकांपासुन सुरक्षित राहिली असे तज्ञांचे मत आहे.
१९३० ते १९६० पर्यंत प्राथमिक संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते. पण स्वातंत्र्यानंतर रानी की वावला गॅझेटद्वारे संरक्षित स्थळाचा दर्जा दिला आणि त्याचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आला. जेव्हा पुरातत्त्व विभागाने ताबा घेतला तेव्हा मुख्य विहिरीचा वरचा भाग भग्नावस्थेत होता तर इंग्रज पुरातत्व तज्ञांनी नोंद केलेले तोरणद्वाराचे अस्तित्वच नव्हते. १९६० नंतर खऱ्या अर्थाने खोदण्याचे, संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले. वेगवेगळ्या कालखंडात केलेले हे काम पुरातत्त्व विभागाने २००८ पर्यंत पुर्ण केले. सर्व बाबींची पूर्तता करून २०१४ साली रानी की वावला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला.
संबंधित पुस्तके
अधिक माहितीसाठी खाली दिलेली पुस्तके (इंग्रजी भाषेत) वाचा:
टिप: आम्ही वरती दिलेल्या पुस्तकांच्या आधारे आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा लेख लिहिला आहे.