आमच्या भेटीचा महिना:
जानेवारी २०१९
हवामान स्थिती:
१६° से to २६° से
खाद्य वैशिष्ट्य:
-
खरेदीच्या वस्तू:
-

जवळपास ४४०० वर्षांपूर्वी एखादे बंदर अस्तित्वात होते, तेही भारतात असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे देणार असाल तर पुन्हा विचार करा.

होय, ते अस्तित्त्वात होते.

लोथल – भारताच्या इतिहासातील सुनियोजित हडप्पाकालीन बंदर

लोथल येथील अवशेषांमध्ये शहर रचनेसोबत एक मोठी गोदी(Dock), मालवाहतुकीची जागा किंवा धक्का(Wharf) आणि गोदामाचाही(Warehouse) समावेश आहे. लोथल येथील उत्खननात सापडलेले पुरावे हे २४५० ते १६०० ख्रिस्तपूर्व दरम्यानच्या हडप्पा संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध करतात.

या लेखात आपण याच सिंधु नदीच्या खोऱ्यातील लोथल शहराबद्दल जाणून घेणार आहोत. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका तालुक्यात, खंभाटच्या आखातीजवळ आणि साबरमती नदीची उपनदी असलेल्या भोगवा नदीच्या काठी वसलेले हे लोथल. लोथल हा शब्द गुजराती बोलीतील “लोथ आणि थल(स्थल)” हे दोन शब्द एकत्र करून तयार झाले आहेत. लोथल म्हणजे “मृतांचा ढिगारा (Mound of the dead)” जसा सिंधी भाषेतील “मोहेंजोदडो(Mohenjo daro)” देखील तसाच अर्थ व्यक्त करतो.

लोथलचे एका चित्रकाराने रेखाटलेले प्रातिनिधिक संकल्पचित्र (कलाकाराचे नाव माहित नाही)

लोथलचे एका चित्रकाराने रेखाटलेले प्रातिनिधिक संकल्पचित्र (कलाकाराचे नाव माहित नाही)

आताच्या अवशेषांवरुन लोथल जरी लहान वाटत असले तरी प्राचीन काळी हे शहर तुलनेत बरेच मोठे असल्याचे मानले जाते. गेल्या 3000 वर्षात कालांतराने वाहुन आलेल्या गाळामुळे तसेच झीज झाल्यामूळे शहराचा आकार लहान झाला असावा. ढिगाऱ्याच्या दक्षिणेकडे–म्हणजे साधारण १००० फुटांवर–सापडलेल्या बांधकामांचे अवशेष आणि रंगविलेल्या भांड्यांच्या शोधावरुन, या शहराचा विस्तार हा सध्याच्या सीमांपलीकडे खुप जास्त होता हे दिसून येते.

पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. राव नमूद करतात:

लोथल च्या उत्खननातील एक अविस्मरणीय दिवस म्हणजे, जेंव्हा साधारण दोन तासांत, एका छोट्या “भट्टीच्या” म्हणजेच जवळपास ३ चौरस फूट भागामध्ये सुमारे ५० टेराकोटाचे सिलिंग्ज (ज्यावर शिक्के मारले जायचे) सापडले होते.

एवढ्या शिक्क्यांवरुन असे सिद्ध झाले, की आयात-निर्यातीच्या व्यापारातील एखादे मालवाहु जहाज प्रमाणित (Sealing) करण्यासाठी सिंधु संस्कृतीचे शिक्के वापरले जात होते. तसेच या शिक्क्यांच्या सापडण्याने हे देखील सिद्ध केले, की लोथल एक महत्त्वपुर्ण व्यावसायिक केंद्र होते.

उच्च वसाहतीतील अवशेष

लोथल येथील उत्खननामागचे मुख्य कारण:

लोथलच्या उत्खननामागील मुख्य हेतु, लोथल आणि हडप्पा संस्कृतीचा संबंध होता किंबहुना लोथल हा “हडप्पा” संस्कृतीचाच एक भाग होता हे सिद्ध करण्याचा होता. लोथलच्या रहिवाशांनी देखील हडप्पा आणि मोहेंजोदडो शहरांप्रमाणेच भौतिक समृद्धी उपभोगली असेल का याचा शोध घेणे हा होता. उत्खननाच्या सुरुवातीच्या काळातच सिंधु संस्कृतीची वैशिष्ट्ये असलेली शिक्के, वजने आणि रंगकाम केलेल्या भांड्यांच्या शोधानेच उत्खननाचे उद्दिष्ट सार्थ होत गेले. उत्तम शहररचना आणि उत्कृष्ठ अशा सांडपाणी नियोजन पद्धतीच्या पुराव्यांनी हे हडप्पा संस्कृतीचे शहर असण्याची शंकाच पुसली गेली.

Indus sealings

सिंधू संस्कृतीतील शिक्के (Indus sealings)

सिंधू संस्कृतीतील रंगवलेली मातीची भांडी

सिंधू संस्कृतीतील रंगवलेली मातीची भांडी

लोथल येथील शेगडी किंवा भट्टी

लोथल येथील शेगडी किंवा भट्टी

लोथल शहर रचना:

मुळ लोथल निवासी आणि हडप्पन लोक यांच्यामध्ये सुरुवातीला व्यापारी संबंध होते. लोथलचे महत्व जाणुन हडप्पन लोक हळूहळू तिथे स्थायिक झाले असावेत. तसेच स्थायिक होण्याची प्रक्रिया ही हळूवार झाली असुन कोणत्याही हिंसेशिवाय झाली असावी कारण तिथे कसल्याही हिंसाचाराचे पुरावे सापडले नाहीत. हडप्पन लोक स्थायिक होताना लोथल मधील लोकांबरोबर मिसळत हळू हळू आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने हडप्पा संस्कृतीची चिन्हे असणारी मातीची भांडी, दगडी अवजारे आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आपल्याबरोबर घेऊन आले आणि वापरात आणले. तसेच लोथलच्या स्थानिकांनी देखील हडप्पन लोकांचे आधुनिक तंत्रज्ञान आणि अवजारे आनंदाने स्वीकारली असावीत आणि त्यांच्या संबंधित फायद्यांसाठी वजनाचे आणि नवीन मापदंडांचे नवीन मानके स्वीकारली असावीत. कालांतराने पुरामुळे गाव उध्वस्त झाले असावे आणि शहराच्या पुनर्रचनेची एक विस्तृत रूपरेषा आखुन, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अंमलात आणली गेली असावी. भविष्यात गावांना अशा पुर किंवा विनाशांपासुन वाचवण्यास प्राधान्य देऊन सर्व नियोजन केल्याचे लक्षात येते.

लोथल येथील उच्च वसाहतीतील घरे

लोथल येथील उच्च वसाहतीतील घरे

उत्तम जीवनशैली आत्मसात करण्याच्या दृष्टीने शहराचे नियोजन केले गेले ज्यामध्ये सांडपाण्याची गटारे, विहिरी आणि विशेषतः औद्योगिक क्षेत्राला निवासी क्षेत्रापासून वेगळे करणे यांचा समावेश होता. सुलभ रहदारीसाठी विस्तृत रस्ते होते जे साधारण 12 फूट रुंदीपासून 40 फूट रुंदीपर्यंत होते. रस्त्यांच्या दुतर्फा किंवा गल्लीच्या दोन्ही बाजूला सरळ रांगेत 4 ते 12 फूट उंच कट्ट्यावर घरे बांधली गेली. या रस्त्यांखाली मोहेंजोदडो सारखी किंवा त्यापेक्षा काही दृष्टीने आधुनिक सांडपाण्याची व्यवस्था कार्यरत होती. लोथलची सांडपाण्याची व्यवस्थेत अत्यंत कार्यक्षम असे जमीनीखालचे नाले, सांडपाण्याची गटारे, शोषखड्डे यांचा समावेश होता.

गोदी, माल वाहतुकीसाठी असणारा धक्का आणि गोदामाचे बांधकाम हे व्यापाराला चालना देण्यासाठी केलेले उत्तम नियोजन आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी दर्शवते.

पुरापासुन संरक्षण करण्यासाठी संपुर्ण शहराला बाहेरील बाजुने चिखलाच्या विटांनी एक भिंत बांधली गेली होती. औद्योगिक क्षेत्र उदा. दागिन्यांची आणि धातु कामाची भट्टी/कारखाना हि रहिवासी भागांपासून वेगळी केली गेली होती. तसेच दफनभुमी हि हेतु पुरस्सर शहराबाहेर आणि पाण्याच्या स्त्रोताजवळ ठेवण्यात आली होती.

लोथल येथील उच्च वसाहत

लोथल येथील उच्च वसाहत

लोथल येथील जमिनीखालच्या नाले किंवा गटारे

लोथल येथील जमिनीखालच्या नाले किंवा गटारे

लोथल येथील मोठे न्हाणीघर

लोथल येथील मोठे न्हाणीघर

लोथल येथील सर्व घरांत अगदी उच्च (Acropolis) आणि दुय्यम (Lower town) वसाहतीतही न्हाणीघराची व्यवस्था होती. यावरुन ते लोक स्वच्छतेच्या बाबतीत किती जागरूक होते हे समजते. परंतु इतर सर्व भागांच्या तुलनेत उच्च (Upper town) वसाहतीत, सर्वोत्तम न्हाणीघरे आणि सांडपाण्याची व्यवस्था केलेली होती.

लोथल येथील सांडपाण्याची व्यवस्था

लोथल येथील सांडपाण्याची व्यवस्था

लोथल येथील उच्च वसाहतीतील जमिनीखालचे नाले/गटारे

लोथल येथील उच्च वसाहतीतील जमिनीखालचे नाले/गटारे

लोथल येथील दुय्यम वसाहत

लोथल येथील दुय्यम वसाहत

लोथल येथील दुय्यम वसाहत

लोथल येथील दुय्यम वसाहत

लोथल येथील दुय्यम वसाहत

लोथल येथील दुय्यम वसाहत

लोथल येथील दुय्यम वसाहत

लोथल येथील दुय्यम वसाहत

हडप्पा सभ्यतेत “एकरूपता किंवा एकसमानता” हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हडप्पा संस्कृतीच्या प्रभावाखाली आलेल्या सर्व शहरांच्या प्रदेशात हडप्पा लोकांच्या पद्धती आणि वापरातील वस्तुंमध्ये एकसमानता स्पष्टपणे दिसुन येते.

लोथल येथील गोदी

जेव्हा लोथल येथे ढिगाऱ्याचे उत्खनन करण्यास सुरवात झाली, तेव्हा त्यांना भट्टीत जाळलेल्या विटांच्या भिंतीची रचना निदर्शनास आली. त्याबाबतीत अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी खोदकाम करुन काळजीपुर्वक परिसर साफ करण्यात आला. संपूर्ण परिसर साफ झाल्यानंतर ती भिंत समलंब चौकोनी (trapezoid) अश्या आकाराची सर्वात मोठी आणि लांब भिंत ठरली. हडप्पन लोकांनी बनवलेली सर्वात मोठी रचना जी उत्तरेकडून दक्षिणेकडे सरासरी ७११ फूट आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे १२० फूट होती.

लोथल येथील गोदी

लोथल येथील गोदी

सुरुवातीला या लांबलचक भिंतीचा आणि प्रवेशमार्ग असलेल्या या पात्राचा हेतू स्पष्ट नव्हता. किंबहुना त्याच्या उद्देशावरुन वेगवेगळे तर्क आणि वाद होते परंतु दगडांचे नांगर, समुद्री शिंपले, सुमेरियन धाटणीची रंगवलेली मडकी आणि पर्शियन म्हणजेच इराणच्या आखातीचे शिक्के सापडल्यामुळे हा वाद संपुष्टात आला. जेव्हा त्यांनी या सर्वांचा अभ्यास केला आणि एका बाजुला नाला आणि दुसऱ्या बाजुला अतिरिक्त पाणी बाहेर वाहण्याची व्यवस्था सापडली यावरुन तेव्हा ती गोदी (Dock) होती हे स्पष्ट झाले. मालवाहतुक जहाजांना आत येण्याची आणि ८०० फूट लांबीच्या जागेत मालाची देवाण घेवाण करण्यासाठी गोदी बांधली गेली.

नदीपासुन जहाजांना गोदीमध्ये प्रवेशासाठीचा नाला तसेच भरती आणि ओहोटीतही जहाजांसाठी लागणारी पाण्याची पातळी उत्तमप्रकारे नियंत्रित करण्यासाठी केलेल्या बंधाऱ्याची व्यवस्था हे त्या काळच्या अभियंत्यांच्या सशक्त बुद्धिमत्तेची साक्ष देतात.

लोथल गोदाम

गोदीजवळ एक भव्य व्यासपीठावर बांधलेली एक मोठी रचना आहे. ही मुख्य रचना कच्च्या-विटांनी बांधलेल्या घनाकार रचनांची एक मालिका आहे जीचा उद्देश सुरुवातीला स्पष्ट नव्हता. नंतर जहाजातुन आलेल्या मालाची तपासणी व साठवण्याच्या उद्देशाने केलेले “गोदाम” असावे हे स्पष्ट झाले. माल तपासण्यासाठी व शिक्कामोर्तब करण्यासाठी गोदीच्या बाजुने एक घाट किंवा धक्का गोदामाच्या शेजारी तयार केला होता.

लोथल येथील गोदाम

लोथल येथील गोदाम

Warehouse Closeup

लोथल येथील गोदाम

लोथल येथील आयात, निर्यात व उत्पादन

लोथलमध्ये मणी किंवा दागिने बनवण्याचा, हस्तिदंत, शिंपल्याचे काम आणि तांब्याची भट्टी यासारख्या उद्योगांना जास्त महत्त्व होते. त्यांनी बहारीन बेटांच्या माध्यमातुन “मेसोपोटेमियन” शहरांशी व्यापार संबंध स्थापित केले होते. तेव्हा तांबे आणि कथील बाहेरून आयात केले जायचे. ते बहुदा “ओमानच्या तांब्याच्या खाणींमधून किंवा सुसा आणि बहरीनमार्गे “पर्शियन”  प्रदेशातुन येत. युफ्राटिस-टायग्रीस खोऱ्यात सापडल्या जाणारऱ्या शिक्क्यांच्या तसेच, मणी आणि इतर वस्तु सपडल्याने “सुमेरियन” शहरांबरोबर असलेल्या व्यापाराच्या तर्कास दुजोरा मिळतो. तपकिरी रंगाच्या मातीपासुन (Terracotta) बनविलेल्या गोरीला आणि मम्मीच्या प्रतिकृती तसेच आफ्रिकन लाकडाच्या विविध वस्तु यामुळे पुर्व आफ्रिका आणि इजिप्त बरोबरच्या व्यापारास दुजोरा मिळतो. लोथलच्या अनेक कारागीरांना सुरक्षित छताखाली काम करता येईल एवढी मोठी जागा किंवा कारखाना होता. याव्यतिरिक्त, एका “सीलिंग्ज” वर एकापेक्षा अधिक शिक्के सापडले जे व्यापारात काही प्रमाणात भागीदारी असल्याचे दर्शवितात.

लोथल येथील दागिन्यांच्या कारखान्याची भट्टी

लोथल येथील दागिन्यांच्या कारखान्याची भट्टी

Share This:

इतिहास लोथल – हडप्पा कालीन बंदर

भारतीय हद्दीत हडप्पा किंवा सिंधु संस्कृतीच्या वसाहती शोधणे हा पद्धतशीरपणे आखलेल्या एका मोहिमेचा भाग होता. ही मोहीम पुरातत्वशास्त्रज्ञ व लेखक डॉ. एस. एन. राव यांनी हाती घेतली. १९५३ च्या सर्वेक्षणात रंगपूर येथील खोदकामाने हडप्पा संस्कृतीच्या दक्षिणेकडील सौराष्ट्रापर्यंतच्या विस्ताराची पुष्टी केली होती. सिंधु संस्कृतीची वैशिष्ट्ये असलेल्या भांड्यांचे सापडणे हाच एक मोठा पुरावा होता. परंतु विशिष्ट अशा सिंधु सभ्यतेचे प्रतिक असलेल्या शिक्क्यांच्या (Indus Seals) अभावामुळे, साबरमती नदीच्या उपनद्यांच्या प्रदेशात सिंधु संस्कृतीची इतर ठिकाणे शोधण्याची गरज निर्माण झाली.

सिंधु संस्कृतीच्या लोकांनी त्यांच्या वस्तीसाठी, साबरमतीच्या खोऱ्यापासून ते वरच्या भागातल्या डोंगराळ प्रदेशापर्यंतच्या भागाला प्राधान्य दिले असावे. हा विचार मनात ठेवून त्यांनी ढोलका टेकडीपासुन गावोगावी सर्वेक्षण करण्यास सुरवात केली. हे सर्वेक्षण लक्ष्मीपुरासारख्या लहान टेकडीवर संपले. लक्ष्मीपुरा येथे त्यांना मातीची भांडी व तत्सम इतर वस्तू सापडल्या ज्याने सिद्ध झाले की ही टेकडी किंवा ढिगारा हा खासकरुन “लोथल” म्हणून ओळखला जाणारी खरी हडप्पा किंवा सिंधु लोकांची वस्ती आहे.


संबंधित पुस्तके

संबंधित पुस्तकेअधिक माहितीसाठी आपण खालील पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता:

  • Lothal A Harappan Port Town (1955-62) Volume 1 By Mr. S.R. Rao
  • Lothal A Harappan Port Town (1955-62) Volume 2 By Mr. S.R. Rao

टीपः या लेखातील माहिती लिहिण्यासाठी आम्ही वरील दोन पुस्तकांचा आधार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.