२०१९ मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (टीएटीआर) जाण्याचा योग आला. ताडोबा हे महाराष्ट्रातील विदर्भात आहे. उन्हाळ्यातील जून महिना आणि त्यात विदर्भ असल्यामुळे आयुष्यातला ग्रीष्माच्या उष्णतेचा उच्चांक अनुभवला. किमान तापमान ४६ अंश सेल्सियस. उन्हाळ्यात कमीत कमी कपडे घालण्यापेक्षा जास्तीत जास्त अंग झाकुन जावे लागेल असे समजले आणि तेच योग्य होते हे तिथे पोहोचल्यानंतर उमगले.
ताडोबा – नवेगावातील पहाटेच्या काळोखातील सुरुवात
पहाटे लवकर उठून पावणे पाच वाजता नवेगावच्या गेटवर पोहोचलो. नवेगाव गेटवरुन व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये जाण्यासाठी आम्हाला २ दरवाज्यांमधून (बफर आणि कोअर झोन गेट) जावे लागणार होते.
राष्ट्रीय उद्यानात/व्याघ्र प्रकल्पात मुख्य भाग म्हणजे “कोअर झोन” आणि त्याच्या आजुबाजूला असणारा “बफर झोन” असे भाग असतात(लक्षात ठेवा हे माणसाने पाडलेले झोन आहेत ना की प्राण्यांनी).
जंगलात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशपत्र (तिकिट) आणि ओळखपत्राची पडताळणी होते पण तिथे कोणीच दिसत नव्हते. आम्ही सामान्य वेळेपेक्षा खुप आधी पोहोचलो होतो. सर्वत्र काळोख होता, फक्त २ दिवे बसविलेले होते – एक ऑफिस इमारतीमध्ये आणि दुसरा प्रवेशद्वाराजवळ. दिव्यांच्या जवळपास पडत होता तोच काय तो प्रकाश. रातकिड्यांचा आणि दूरवरुन येणारा रातवा पक्ष्याचा (Nightjar) आवाज ऐकू येत होता. एका झाडाखाली आम्ही दरवाजे उघडण्याची वाट पाहत होतो. त्या झाडावर गेटवरच्या दिव्याचा प्रकाश पडला होता ज्यामुळे झाडावरची बोरासारखी छोटी फळे चांदण्यांसारखी चमकत होती जणू काही आकाशगंगा.
आम्ही जिप्सीच्या(सफारीची जीप) येण्याची वाट पाहत होतो. आम्ही पाहिले की दोन माणसे तिथल्या एका खोलीसारख्या ऑफिसच्या छतावर झोपली होती आणि आता वेळ झाल्यावर लोकांना जंगलात सोडण्यासाठी एंट्री करायला उतरली. पहाटे पावणे पाचची वेळ, गेटवर झोपेतुन खाली उतरलेले ते दोघे आणि आम्ही एवढेच. उत्सुकतेने त्यांना छतावर झोपायचे कारण विचारल्यानंतर त्यातील एकाने सांगितले की, इथे जंगलात वाघ, बिबट्या आणि इतर प्राणी बर्याचदा रात्रीच्या वेळी या इमारतीच्या सभोवती येतात. समोर अंधारात एका विशाल झाडाकडे बोट दाखवून तो म्हणाला, “काल रात्रीच त्या झाडाखाली आम्हाला बिबट्या दिसला”. आमच्या माना गर्रकन त्या झाडाकडे वळाल्या आणि आम्ही आजूबाजूचा परिसर तपासण्यास सुरवात केली… अजूनही अंधार होता आणि आपल्याला जरी काही दिसत नसले तरी वन्य प्राण्यांना अंधारात व्यवस्थित दिसते. एक एक करत जंगलात जाणाऱ्या जिप्सी आल्या. कागदपत्रे तपासल्यानंतर आम्हाला एका जिप्सीत बसायला सांगितले गेले. गेटमधून जंगलात प्रवेश करणारे आम्ही प्रथमच होतो. सकाळी ५ वाजता आम्ही दुसर्या गेटकडे निघालो.
अंधारात ताडोबा जंगलातील पहिले स्वागत
पहिल्या गेटमध्ये प्रवेश करताच झाडाच्या फांद्यावर बसलेल्या मासेखाऊ तपकिरी घुबड (Brown FIsh Owl) ने आमचे स्वागत केले… अगदी स्तब्ध बसले होते. ते आमच्या उपस्थिची तसदीही न घेता तसेच बसुन राहिले. बंद डोळ्यांनी जणु काही गहन चिंतनात. या सुंदर पक्ष्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही पण खुप अंधार असल्याने कॅमेरा काही फोकस करेना. कसाबसा कॅमेरा सेटिंग करून फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. नेमका फोटो काढणार इतक्यात तो कधी उडुन गेला होता हे आमच्या लक्षात देखील आले नाही.
ताडोबा जंगलातील बराचसा रस्ता हा खडकाळ आहे. या खडकाळ मार्गावर उडत आणि डुलत आम्ही मुख्य क्षेत्राच्या (Core Zone) दिशेने गेलो. बफर झोनमधील हा मार्ग, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दाट सागवानाच्या झाडांनी व्यापलेला होता. डोळे पाहू शकतील इतके दूरवर पसरलेले, लांबच लांब हेच जंगल. काही अंतराने उंच गवताळ प्रदेशाकडे वळालो जिथे वर्षभरा अगोदर मानवी वस्ती असल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. दोन गेट असण्यामागे हेच कारण होते. मुख्य गेट जे कोअर गेट म्हणून ओळखले जाते तिथुनच बाहेर काही अंतरावर असलेल्या त्या वस्त्या. तिथल्या लोकांना वनविभागाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करुन मानव-प्राण्यांचे संघर्ष टाळण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले होते. वनविभागाने हे खरोखर अवघड पण कौतुकास्पद काम केले आहे.
हा गवताळ प्रदेश पार करून आम्ही सकाळी साडेपाच वाजता उघडणार्या जंगलाच्या कोर झोनमधील गेटवर पोहोचलो. जंगल प्रवेशाची आणि बाहेर येण्याची वेळ सूर्योदय आणि सूर्यास्त यावर अवलंबून असते.
गेटवर आमच्याकडील सर्व मोबाइल फोन एका बॉक्समध्ये गोळा करून कुलूप लावले. मोबाइल नेटवर्क / फ्रिक्वेन्सी जंगलातील पक्ष्यांसाठी समस्या निर्माण करू शकतात.
आम्ही गेट उघडण्याची वाट पहात होतो तेवढ्यात एका मोठ्या आवाजाने पहाटेची शांतता भंग झाली. हा आवाज एखाद्या झाडाच्या खोडावर वेगाने काहीतरी ठोकण्याचा होता. आवाजाच्या दिशेने पाहिले असता एक नर सुतारपक्षी (Flame Back Woodpecker – Male) झाडावर दिसला. तो त्याच्या भाल्यासारख्या चोचीने खोडावर टोच्या मारत होता. फ्लेम-बॅक वुडपेकरला गोल्डन-बॅक वुडपेकर देखील म्हणतात. नर सुतारपक्षाच्या डोक्यावर लाल रंगाचा मुकुटासारखा भाग त्याच्या संपुर्ण शरीरापेक्षा स्पष्टपणे उठून दिसतो.
सर्व कागदपत्रे परत एकदा तपासून कॅमेरा फी भरुन, कोअर झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार झालो.
दिवस उजाडताच जिवंत झालेले ताडोबा जंगल
सकाळी ५.३० वाजता गेट उघडल्यानंतर हळुहळु आत निघालो. बऱ्यापैकी उजाडले असल्याने सगळे स्पष्ट दिसायला लागले. वाळलेला पाला पाचोळा, गाडी जाताना त्यांचा आवाज आणि त्याचा एक प्रकारचा वास आता जाणवु लागला. काही अंतरावर एक मादी सांबर दिसली आणि आम्हाला पहाताच घाईघाईने जंगलाचा रस्ता ओलांडून पलीकडल्या झाडांमध्ये दिसेनाशी झाली. आम्हाला पाहुन प्राणी/पक्षी घाबरून निघुन जाऊ नयेत म्हणुन आमची गाडी हळुहळु पुढे सरकत होती. काही किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर एक वळण येऊन एका वेगळ्याच विश्वात आल्याचा भास होतो.
पुढे जात असताना अचानक डावीकडे झाडाझुडुपांमध्ये हालचाली जाणवल्या. उन्हाळ्यामुळे झाडांच्या फक्त फांद्या राहिल्या होत्या तरीही दाट असल्याने स्पष्ट दिसत नव्हते. आम्ही थांबलो आणि त्या दिशेने काळजीपूर्वक शोधत राहिलो. तेवढ्यात झाडांतुन अस्वलाचे लहान पिल्लू बाहेर आले. परंतु आमच्या उपस्थितीने घाबरुन का लाजुन परत आत पळाले. आम्ही एकाच जागी थांबुन होतो पण त्या पिलाचा असे आत बाहेर येण्याचा प्रकार एका खेळासारखा चालु होता. त्याला रस्ता ओलांडण्यासाठी आणि एक चांगले छायाचित्र घेण्यासाठी आम्ही थोडे मागे सरकलो. छायाचित्र काढण्यास तयार होण्यापूर्वी ते झटकन रस्ता ओलांडून झाडांमध्ये पसार झाले.
आम्ही मागे सरकलो तिथे एका झाडाच्या फांदीवर मोठे डोळे असलेले एक लहान घुबड शांत बसले होते. आमचे वन मार्गदर्शक (Guide) विलास मामा यांनी आम्हाला वाघ पाहण्यासाठी पुढे जाण्याचा आग्रह केला आणि आम्ही घुबडाला सकाळच्या शांततेचा आनंद घेत एकट्याला सोडून पुढे निघालो!
पुढे हा मार्ग दुसऱ्या एका मार्गाला मिळतो ज्यामुळे T आकार तयार होतो. हा नवीन मार्ग जंगलातील दोन जलाशयांना जोडतो. त्यातील एक या जंगलाचा प्रमुख तलाव आहे. या तलावाचे नाव जंगलाच्या नावावरून म्हणजेच ताडोबा तलाव (Tadoba Lake) असे ठेवले आहे. हा तलाव खुप मोठा असुन घनदाट झाडांनी वेढलेला आहे. त्या उन्हाळ्यातही तलावात मुबलक पाणी होते. भर उन्हात बरेच वन्य प्राणी/पक्षी तहान भागवण्याबरोबर दुपारच्या विश्रांती आणि थंडाव्यासाठी हमखास तलावाजवळ येतात. पण सकाळची वेळ असल्याने तलावावर प्राण्यांची कोणतीही हालचाल नव्हती. तेवढ्यात एक मोहोळ घार(Oriental Honey Buzzard) भागवताना आणि काठावर सावलीत पहुडलेली मगर दिसली.
पंचधारा, त्या ताडोबा झोनमधील सदाहरित प्रदेश
आम्ही त्याच वाटेवर पुढे निघालो. तलावापासून पुढे ३०० मीटर अंतरावर, “पंचधारा” नावाचा हिरव्यागार झाडाझुडपांनी समृद्ध भागाजवळ गेलो. तलावाच्या छोट्या प्रवाहातून बनलेला हा भाग वर्षभर हिरवा आणि थंड हवेच्या ठिकाणासारखा भासतो. तिथेच समोर टेकडीवर फॉरेस्ट रेस्ट हाऊस आहे. आमचे मार्गदर्शक विलासमामा यांनी काल संध्याकाळी येथे एक वाघ पाहिला, जो त्या भागाचा राजा मटकासुर म्हणून ओळखला जातो. आम्ही उत्सुकतेने तिथेच थांबलो आणि नाल्याकडून किंवा दाट झाडांमधून काही संकेत येण्याची वाट पाहू लागलो.
आम्ही वाट पाहत होतो तेव्हा तुरेबाज गरुडची(Crested Hawk Eagle) एक जोडी बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीवर बसली होती. झाडाची फांदी खालच्या दिशेने झुकली होती. मादी वरच्या बाजुला बसली होती तर खालच्या बाजूला एक नर होता. मादीने आपले तोंड उघडे ठेवून जीभ बाहेर काढली होती. उन्हाळ्यातील बदलत्या तापमानात स्वत:ला जुळवून घेण्यासाठी म्हणजे शरीराला थंड ठेवण्यासाठी असे करत असावी. श्वासोच्छवासाच्या या कृतीला पॅन्टिंग म्हणतात.
इतर पर्यटक जिप्सी तेथे जवळ यायचे, चौकशी करुन थोडा वेळ थांबायचे. प्राण्यांकडे विशेषत: वाघांच्या कोणत्याही हालचालींची किंवा संकेताची वाट पहात थांबायचे आणि निघून जायचे. तासभर थांबूनही काही विशेष हालचाल नव्हती. मग आम्ही येनबुडीला जाणाऱ्या दुसर्या मार्गाकडे फॉरेस्ट रेस्ट हाऊसच्या बाजूस निघालो. याच ठिकाणी मटकासुर काही दिवसांपूर्वी त्या प्रदेशात फिरत होता. वाघ पहाण्याच्या आशेने आम्ही येनबुडी या पाणवठ्ययाकडे निघालो.
येनबुडीच्या दिशेने जाताना वाटेतच जमिनीवर थोडी हालचाल पाहिली. पडलेल्या झाडाच्या एका फांदीवर नवरंग (Indian Pitta) नावाचा एक सुंदर पक्षी होता. नवरंग हा “सामान्यतः दिसणारा” पक्षी नसुन तो बहुतेक जंगलात किंवा दाट वृक्षाच्छादित प्रदेशात दिसतो. या पक्ष्यावर ९ रंगांच्या वेगवेगळ्या छटा दिसू शकतात म्हणुन त्याला “नवरंग” असे म्हणतात म्हणजे अक्षरशः ९ रंग असतात. हा एक लहान आकाराचा पक्षी असून मजबूत पाय, टोकदार चोच आणि एक लहान शेपटी असते. मुख्यतः पानांवरील कीटकांवर हा जगतो.
नवेगाव गेटचे उजेडात काढलेले फोटो
क्रमशः
ताडोबा भाग २ – वाघीण आणि बछडे →